“विद्यया रक्षिता संस्कृति: सर्वदा ।” (नेहमीच विद्येच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण केले जाते) हा विचार घेऊनच “स्वरमाधव फाऊंडेशन” या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. भारताला भाषिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक असा विविध प्रकारचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. संस्कृत, प्राकृत, पाली यासारख्या प्राचीन भाषांमधून या वारश्याच्या पाऊलखुणा आपल्याला आढळतात. या भाषा म्हणजे केवळ एक भाषा किंवा अस्मितेचे प्रतीक नसून प्राचीन भारतीय शास्त्रे, तत्त्वज्ञान, कला, काव्य, इतिहास इत्यादी अनेक विषय आपल्या पूर्वजांनी या भाषांच्या माध्यमातून हाताळलेले आढळतात. म्हणूनच या भाषा ज्ञानाची भांडारे मानली गेली आहेत. भारतीय भाषांमधील या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर त्यातील संशोधनाबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. याच भावनेतून सुरुवातीला “स्वरमाधव मंडळा”ची स्थापना करण्यात आली. पण मंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने “स्वरमाधव फाऊंडेशन” या नावाने ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यामुळे आता केवळ प्राचीन भारतीय भाषा, त्यातील विषय एवढ्यापुरतीच ट्रस्टच्या कार्याची व्याप्ती नसून विविध क्षेत्रातील ज्ञानाची कवाडे खुली करण्यासाठी “स्वरमाधव फाऊंडेशन” कटिबद्ध आहे.